मोरा मोरा नाच रे
मोरा मोरा नाच रे
अंकलिपी वाच रे
वाचता वाचता बोल रे
पृथ्वी कशी गोल रे
गोल चेंडू उडला
सूर्यावरती पडला
कान त्याचा कापला
म्हणून सूर्य तापला
ऊन, हवा आणि
गरम झाले पाणी
पाणी गरम झाले
वाफ़ होऊन आले
सोडूनिया धरती
वाफ़ गेली वरती
आभाळात मग
तिचे झाले ढग
ढग वाजे गडगड
वीज चमके कडकड
वारा सुटला सो-सो
पाऊस आला धो-धो
मोरा मोरा नाच रे
श्रावणाचा मास रे
नाचता नाचता सारा
फ़ुलवून दे पिसारा
गंगाधर मुटे
..................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
...................................................................