कान पकडू नये

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture

कान पकडू नये

आता कुणी कुणाचे कान पकडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये

ते दान का मिळाले? जे टाळले सदा
असले पुन्हा नव्याने सहसा घडू नये

शोधेन मीच माझा, रस्ता पुन्हा नवा
त्या मूक दर्शकांनी सहसा रडू नये

निद्रिस्त मीच केल्या माझ्याच जाणिवा
संवेदनेवरी या मीठ रगडू नये

कोणास कोण प्याले, कळतेच ना कधी
नातेच बाटलीशी सहसा जडू नये

म्हणतात वाहवा, व्वा! स्त्रीरम्य वेड ते
सच्चा विचार सहसा का आवडू नये?

सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली
कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये?

झाले अता पुरेसे, ते बोलले बहू
बाळंत होत ना ती, चर्चा झडू नये

सोसून ऊन वारा, अंकूरतो अता
कोंबेजण्याच आधी सहसा सडू नये

आता कुठे जरासा झालोय मुक्त मी
पायास साखळ्यांनी परत जखडू नये

माझ्याकडे मुळीही किल्ल्या न शिल्लकी
माझ्याविना कुणाचे सहसा अडू नये

हे अन्न सात्त्विकाचे ये ’अभय’ भोजना
मंगल अशा प्रसंगी सहसा दडू नये

                                   - गंगाधर मुटे
………………………………………………
वृत्त : विद्युल्लता
काफिया : पडू
रदीफ : नये
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगा
………………………………………………

प्रतिक्रिया

 • प्रमोद देव's picture
  प्रमोद देव
  July 16, 2011 11:07 AM

  सोसून ऊन वारा, अंकूरतो अता
  कोंबेजण्याच आधी सहसा सडू नये

  इथे ...कोमेजण्याच... असा शब्द हवाय!
  (कदाचित ग्रामीण बोलीत कोंबेजणे म्हणत असतीलही कोमेजण्याला!)
  पण आपली गझल प्रमाणभाषेत असल्यामुळे हा बदल सुचवतोय.

  बाकी गझल छानच झालेय.

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  July 16, 2011 11:18 AM

  प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  कोमेजणे आणि कोंबेजणे हे वेगवेगळे शब्द आहेत.

  कोंबेजणे = कोंब फुटणे = बियाला अंकूर येणे

  ( कोमेजणेचा अर्थ कोमावने, निस्तेज होणे, असा आहे ना?)

 • प्रमोद देव's picture
  प्रमोद देव
  July 16, 2011 11:44 AM

  कोंबेजणे हा शब्द माहीत नव्हता...कोंब फुटणे हे माहीत होते....पण त्याचा कोंबेजणे असाही शब्द बनू शकतो,किंबहुना तो तसा वापरात आहे हे माहीत नव्हतं..
  मला वाटलं की अंकुरलेल्या कोंबाची काही प्रतिकूल कारणाने कोमेजणे ही प्राथमिक प्रक्रिया असावी आणि सडणे ही शेवटची...त्यामुळे अंकुरताक्षणीच सडणे योग्य नाही...असा काहीसा अर्थ वाटला.

  सोसून ऊन वारा, अंकूरतो अता
  कोंबेजण्याच आधी सहसा सडू नये

  ह्यातल्या पहिल्या ओळीत आपण अंकुरतो अता म्हटलंय....म्हणजेच कोंब फुटलाय असा अर्थ होतो...त्यामुळे पुढच्याच ओळीतला कोंबेजण्याचा अर्थ मला कोमेजणे असा असावा वाटला....गजलेच्या दोन ओळीत विरोधाभास...झटका असतो असे कुठेसे वाचलेले असल्यामुळे..तसे वाटले.

  असो आपल्या खुलाशाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  July 16, 2011 01:19 PM

  सोसून ऊन वारा, अंकूरतो अता

  सोसून ऊन वारा, अंकूरलो अता

  या दोन ओळीत फरक आहे. अंकूरतो अता या शब्दाचा अर्थ मी अंकुरायचा प्रयत्न करतोय, असा गृहित धरला आहे.

  ( मात्र यापेक्षा अधिक स्पष्ट लिहायला हवे, हे मान्य.)