सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥
पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥
जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥
तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥
कळेना अभय कैसा । विठूचा झमेला ॥३॥
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
ravipal bharshankar
सुंदर!
Ramesh Burbure
खुप छान आजपर्यंतचा आवडलेला अभंग..!
Ramesh Burbure
खुप छान आजपर्यंतचा आवडलेला अभंग..!
Dhirajkumar Taksande
खूप सुंदर अभंग,
क्षणोक्षणी भक्तांना मदतीची रसद पोहचविणारा विठू आज शोषकांचा साथी झाला. तुकारामाला विचारलेला हा प्रश्न कळेना तुझा विठूचा झमेला.....