हक्कदार लाल किल्ल्याचे…!
या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||धृ||
लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||१||
विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||२||
शेतकर्यांच्या,कामकर्यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||३||
गंगाधर मुटे
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
....................................................................