होत्याचे नव्हते झाले

होत्याचे नव्हते झाले

नात्यामधले अंतर जेव्हा कळते झाले
बघता बघता बघ होत्याचे नव्हते झाले

बाबा गेले ठेउन मागे पैसा, आई.....
पैशासाठी मग सख्खेही सवते झाले

काट्या-कुट्या नि निव्वळ कचरा उरला मागे...
घरट्यामधले पिल्लू जेव्हा उडते झाले

संस्काराच्या पारंब्या छाटून जाळता...
जून घराचे पोकळ वासे पडते झाले

शुभंकरोती-पाढे कोणी घोकत नाही...
देवघरातिल दिवे उगा मिण-मिणते झाले

जीवन-साथी औट-घडीचा ठरला जेव्हा..
संध्याकाळी ऊन पुन्हा रण-रणते झाले

- सुप्रिया जाधव
----------------------------