कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

गंगाधर मुटे's picture


कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा

कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे...
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
नसे संतही या युगाचा तपस्वी.. अशाने चमत्कार व्हावे कुठे?

तुझे आणि माझे जुने रम्य नाते व्रणाच्याप्रमाणे जरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... रुतावे कुठे अन् दुखावे कुठे !

मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे?

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)

नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...

                                                            - ज्ञानेश
---------------------------------------------------------------------------------